महाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत

0
683

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. हजारो कुटुंबे उघड्यावर पडली असून अन्न-पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहेत. देशाच्या वेगवेगळया भागातून केरळकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्र सरकारकडून केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात असल्याची घोषणा      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) येथे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना केरळी जनतेच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या कठिण प्रसंगात केरळी जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

केरळला आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी शुक्रवारपासून महाराष्ट्र सरकार केरळ प्रशासनाच्या संपर्कात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एमसीएचआय-सीआरईडीएआयने दीड कोटी रुपयांची अन्नाची पाकिटे पाठवली आहेत. राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि जितो इंटरनॅशनलने प्रत्येकी ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.