महाराष्ट्र लुटणाऱ्यांची चौकशी करणार – चंद्रकांत पाटील

0
605

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) – महाराष्ट्र गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत, त्यांची चौकशी करणार, अशी  घोषणा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ( रविवारी) येथे केली.  

माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की,  आम्ही ज्यांना पक्षात घेत आहे, त्यांना कोणतीही भीती दाखवण्याची गरज नाही. ते लोक स्वखुषीने भाजपमध्ये येत आहेत. आयकर धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत, त्यासाठी त्या यंत्रणा सहा-सहा महिने त्या प्रकरणाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या कारवाईबद्दल हरकत असेल,  तर त्यांनी  न्यायालयात दाद मागावी, आम्ही काय कुणाला अडवलेले नाही. दोन्ही काँग्रेसमधील दोन अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटून नेल्याने मागच्या पाच वर्षांत आमचे सरकार हतबल होते. आता आपल्याला मजबूत सरकार आणायचे आहे. त्यासाठी नेटाने कामाला लागावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.