महाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता; सेनेचा भाजपवर बाण

0
400

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता विश्लेषणाचे कवित्व सुरू झाले आहे. राज्यात पुन्हा सत्तास्थापनेची संधी मिळालेल्या भाजप-शिवसेनेमध्ये कुरबुरीचा नवा अंक सुरू झाला असून अनपेक्षित निकालावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता आणि नाही,’ असे उद्धव यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘अब की बार, २२० पार’ अशी घोषणा दिली होती. आमच्या समोर कुस्तीसाठी पैलवानचे नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभांतून सांगत होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे निकालातून समोर आले. पवारांच्या झंझावातामुळे महायुतीचा वारू जेमतेम १८० पर्यंतच रोखला गेला. राष्ट्रवादी व काँग्रेसने दमदार पुनरागमन केले. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून निकालाचे विश्लेषण करताना निकालाकडे लक्ष वेधत भाजपला टोले हाणले आहेत. ‘महाराष्ट्राच्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असा जनादेश जनतेने दिल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.