महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

0
166

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले असून मर्जीतील अधिकाऱ्यांकडे महत्वाचे विभाग सोपविले आहेत.

उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडील प्रशासन विभाग कमी केला असून केवळ उद्यान विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे ठेवली आहे. उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडील करसंकलन व कर आकारणी विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडे एलबीटी आणि पशु वैद्यकीय विभाग सोपविला आहे. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे निवडणूक विभाग, दक्षता समितीचा प्रशासकीय कार्यभार कायम ठेवत प्रशासनाचा अतिरिक्त पदभार दिला. सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह परवाना विभागासह करसंकलन विभागाची अधिकची जबाबदारी दिली.

सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडील प्रशासन काढून केवळ ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार ठेवला आहे. तर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडील जनता संपर्क विभागाची जबाबदारी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाने यांच्याकडे सोपविली आहे.