भाजपने केवळ प्रसिद्धीसाठी आणि जनतेच्या भावनेशी खेळणारे ठराव करू नये – राजू मिसाळ

0
292

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – महापालिकेतील सत्ताधारी भाजपला खरंच शहरातील पाचशे स्केअर फूट पर्यंत घरास मिळकत कर माफी, अनधिकृत शास्तीकर माफीचा प्रश्न सोडवायचा होता. तर, त्यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना का ठराव केला नाही? असा सवाल करत राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपकडून केवळ प्रसिद्धीसाठी आणि जनतेच्या भावनेशी खेळणारे ठराव केले जात आहे. विविध विषयावरून भाजपची स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला.

मिसाळ म्हणाले, भाजपचे पदाधिकारी गेल्या दोन वर्षापासून महापालिकेच्या अधिकार कक्षेत नसताना आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या विषयाबाबत ठराव करीत आहेत. पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत सदनिकांना मिळकत कर माफी, कोरोना काळात शहरातील गरिबांना तीन हजाराची आर्थिक मदत, अनधिकृत बांधकामाना 100 टक्के शास्ती कर माफी असे ठराव करून आपणांस गरिबांबाबत कणवळा असल्याचे दाखविले जात आहे. जे महापालिका अधिकारात असणारे ठराव करणे अपेक्षित आहे. जनतेच्या भावनांशी खेळ करणारे ठराव करणे, राजकारण करणे भाजपने सोडावे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठराव केले जात आहेत. कोरोना काळामध्ये राज्य सरकारच्या वतीने गोरगरीब कष्टकऱ्यांना मदत देण्याचे निर्णय घेण्यात आला. त्याहीवेळी महापालिकेत कोणतीही आर्थिक मदत देण्याची तरतूद नसतानाही मदतीचा ठराव करुन स्टंटबाजी केली. मदत देणार असे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात मदत दिलीच नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ केला. तसेच मिळकत कर माफीचा निर्णय ही असाच आहे. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आणि राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ठराव केले जात आहेत, असेही मिसाळ म्हणाले.

शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचे भूत घालविण्याच्या आश्वासनाचे काय झाले?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 2017 ते 2019 आणि राज्यात 2014 ते 2019 या काळात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अनधिकृत बांधकामे शास्तीकर माफी हे प्रश्न पूर्णपणे सुटले नाहीत. शास्तीकर माफीचा प्रश्नही अर्धवट ठेवण्यात आला. याचे भाजपने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला सत्ता द्या, शास्तीकराचे आणि अनधिकृत बांधकामाचे भूत घालवू, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर हे दोन्ही प्रश्न अर्धवट ठेवण्यात आलेले आहेत. हे या शहरातील सुजाण जनता जाणते आहे. शंभर टक्के शास्तीकर माफीचे आश्वासन देऊन केवळ एक हजार स्केअर फुट घराचा कर माफ केला, असेही मिसाळ म्हणाले.