महापालिका उद्योग कक्षाची जबाबदारी निळकंठ पोमण यांच्याकडे

0
181

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उद्योग सुविधा केंद्राचा पदभार मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रामधील उद्योजकांचे महापालिकेशी संबंधित असणारे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी, कार्याभ्यास व कार्याचे मूल्यमापन करुन नियोजन व विवेकपूर्ण समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती. त्यानुसार पालिकेने उद्योग सुविधा केंद्र स्थापन कक्षाची स्थापना केलेली आहे. शहरातील तांत्रिक उद्योगांना सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून महापालिकेमार्फत द्यावयाच्या सोयी-सुविधांचे कामकाज व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) कक्षामार्फत होत आहे. या कक्षाची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पोमण यांच्याकडे आहे.

उद्योग सुविधा केंद्र व व्यावसायिक सामाजिक जबाबदारी कक्ष या दोन्ही कक्षांकडील कामकाजाचे स्वरुप समान आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांच्याकडील उद्योग सुविधा कक्षाची जबाबदारी काढून पोमण यांच्याकडे सोपविली आहे. या कक्षाच्या कामकाजासाठी आवश्‍यक असणारा कर्मचारी वर्ग माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून उपलब्ध करुन घ्यावे लागणार आहेत.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय व स्थापत्य (उद्यान) विभागाकडील प्रकल्पांचे कामकाजासाठी पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत डॉग, कॅट पार्क, डॉग, मॉल, बहिणाबाई प्राणीसंग्रहालय पुनर्विकास, भोसरी येथील मत्स्यालय पुनर्विकास आणि तळवडे मृग उद्यानाचे कामकाज करण्यात येत आहे. ही कामे जलद गतीने होण्यासाठी तसेच कार्यपध्दतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ढोले यांनी संबधित विभागांना निर्देश द्यावेत. तसेच कामकाजाचा मासिक अहवाल आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.