महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

0
148

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : महापालिकेच्या चिंचवड येथील शाळेतील आठवी इयत्तेतील विद्यार्थी शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडला. यात त्याचा मृत्यू झाला. शाळेत सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेतल्यानेच ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे अमोल थोरात यांनी केली आहे.

अमोल थोरात यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. पत्रकात नमूद केले आहे की, पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील चापेकर चौकातील शाळेत शुक्रवारी (दि. १६) आठवीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शाळेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील रेलिंगवर घसरगुंडी खेळताना पडल्याने गंभीर जखमी होऊन मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना असून, संबंधित विद्यार्थ्यांचे कुटुंब पूर्णपणे खचले आहे. त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. त्यासाठी महापालिकेने या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना करण्यात याव्यात. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा विमा काढावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना आजारपणात उपचारासाठी मदत होईल तसेच दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबीयांना दिलासा मिळू शकेल.

महापालिका प्रशासनाच्या अनागोंदीमुळे अशा घटना घडत आहेत. वाकड येथे तीन मजली धोकादायक निर्माणाधीन इमारत कलल्यामुळे जमीनदोस्त करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे महापालिका प्रशासनातील व बांधकाम परवाना विभागातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली. त्यापाठोपाठ शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे.

सर्जनशीलतेसाठी ‘जल्लोष शिक्षणाचा’, सुरक्षेसाठी काय?

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागावी म्हणून महापालिका शाळांमध्ये ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम आवश्यकच आहेत. मात्र त्यासोबत विद्यार्थ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त सिंह यांनी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला आहे.