आंदोलनानंतर प्रतिकात्मक पूजा करून हिंदु संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी

0
97

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली मुंबईजवळील घारापुरी बेटावर ‘घारापुरी लेणी’ (एलेफंटा केव्हज्) हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदु संघटनांनी जनआंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदु जनजागृती समिती आणि ‘सुदर्शन वाहिनी’च्या पुढाकाराने घारापुरी येथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजाअर्चा केली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी या जनआंदोलनाचे नेतृत्त्व केले. या पूजाविधीसाठी घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून हातात भगवे ध्वज घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देत धर्मप्रेमींनी घारापुरी लेणीकडे प्रयाण केले. येथील शिवपिंडीला गंगाजलाने अभिषेक करून पुष्प अर्पण करून सामूहिक आरती करण्यात आली. या ठिकाणी शिवस्तोत्राचे पठण करून हिंदूंनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला.

काय आहे प्रकरण ! : घारापुरी येथील लेणी ६-८ व्या शतकाची असल्याचे मानले जाते. येथील लेणी म्हणजे भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. येथे ५ गुंफांचे समूह असून या सर्व गुंफांमध्ये शैवलेणी कोरण्यात आली आहेत. पोर्तुगीजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटिशांच्या काळात या शिल्पांवर गोळीबारीचा सराव करण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून येथील शिवपिंडीची पूजाअर्चा बंद आहे.

धार्मिकस्थळी पूजेचा अधिकार नसणे हा हिंदूंवरील अन्याय ! – रमेश शिंदे
केंद्रीय संसद समितीच्या अहवालानुसार पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने जर त्यांच्या अखत्यारितील धार्मिक ठिकाणी पूजेची अनुमती दिली असेल, तर राज्यांनाही ती देण्यास काहीच हरकत नाही. जगन्नाथपुरी येथे कोणार्क सूर्यमंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार नाही. सूर्यदेवाची मूर्ती समोर असूनही हिंदूंना पूजा करता न येणे, हा एकप्रकारचा अन्यायच होय, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील ! – रणजित सावरकर
जीवन जगतांना संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा. घारापुरी येथील लेणी आमची संस्कृती आहे. कुणासाठी ही श्रद्धास्थाने असतील, तर कुणासाठी पूजास्थाने असतील. दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात; मात्र ही लेणी आमच्या पूर्वजांनी घडवली आहेत, हे सत्य आहे. त्यामुळे त्यांचा अवमान करणे कुणालाही आवडणार नाही. कुणी आपल्या घरात यायचे आणि देवघरात चपला घालून शिरायचे, हे योग्य नाही. चर्चमध्ये जोडे घालून जाणे चालत असले, तरी हिंदूंच्या देवघरात चपला घालणे, ही आपली संस्कृती नाही. आपण आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.

पुरातत्व विभागाच्या सर्व धार्मिकस्थळी हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा ! – सुरेश चव्हाणके
पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांमध्ये पूजा होत नाही; पण पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मशिदींमध्ये नमाजपठण होते. पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील हिंदूंच्या धार्मिकस्थळांमध्येही चप्पल घालून जातात. घारापुरी येथील धार्मिक स्थळाचीही अशीच स्थिती आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हिंदूंची जेवढी धार्मिक ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी पूजाअर्चा चालू करण्यासाठी अनुमती मिळावी, तसेच तेथे पादत्राणे घालून प्रवेश करण्यावर बंदी घालावी, अशी आमची मागणी असल्याचे सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी म्हटले आहे.
घारापुरी लेणी हे शिवाचे स्थान आहे. त्यामुळे घारापुरी गुंफा सोमवारी बंद असू नये, अशी मागणी आम्ही यापूर्वीच भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे. येथील शिवमंदिरात पूजन करता यावे, अशी मागणीही आम्ही शासनाकडे केली आहे, असे घारापुरी येथील उपसरपंच श्री. बळीराम ठाकूर यांनी या वेळी म्हटले.