महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना मिळावा – माजी खासदार गजानन बाबर यांची राज्य सरकारकडे मागणी

0
546

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – कोरोना साथरोग प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व खाजगी व शासन मान्यता प्राप्त रुग्णालयातर्फे मिळावा तसेच योजनेच्या लाभाची मुदतवाढ साथीचा प्रादुर्भाव असेपर्यंत करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना त्यानी एक निवेदन पाठविले आहे.

निवेदनात माजी खासदार बाबर म्हणतात, राज्यामध्ये 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारित महात्मा फुले जन आरोग्य योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना सलंगणीकरण करून एकत्रित स्वरूपात मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी च्या सहकार्याने 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केले जाते. परंतु योजनेचा लाभ राज्यातील 80 ते 85 टक्के नागरिकांना होतो. उर्वरित नागरिक वंचित राहत आहेत. कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत असून परिस्थिती चिंताजनक होते आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी 23 मे 2020 रोजी परिपत्रक डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव ,महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी काढून राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयात मार्फत मान्यताप्राप्त दराने उपचार करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानतो.
परंतु आज जर आपण वस्तुस्थिती बघितली तर मे महिना व जुलै महिना यामध्ये रुग्ण वाढीचे संख्येत खूप फरक आहे, आज जर आपण फक्त पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला तर पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखापर्यंत पोचली आहे व आपण अंगीकृत केलेल्या रुग्णालयांचा विचार केला तर यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना साठी खाजगी रुग्णालयात पैकी एकॉर्ड हॉस्पिटल मोशी, देसाई एक्सीडेंट हॉस्पिटल भोसरी, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड , ओम हॉस्पिटल भोसरी, डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी ,शासन मान्यताप्राप्त रुग्णालयात पैकी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी यांचा सामावेश होतो.
परंतु यापैकी दोन हॉस्पिटलमध्ये अजून कोरोना उपचार सुविधा सुरू झालेली नाही.असे आरोग्य विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार समजते.
वास्तविक पाहता या रुग्णालयांचा विचार केला तर सहापैकी चार रुग्णालयात एकूण बेडची संख्या जवळपास 2200 बेडची संख्या , 198 आय सी यू बेड ,वेंटिलेटर 73 असून ही संख्या अपुरी आहे. वास्तविक पाहता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज जर आपण पिंपरी चिंचवड जी वस्तुस्थिती बघितली तर आत्तापर्यंत 9000 कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत तसेच सध्याच्या परिस्थितीत जवळपास 2500 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत ,दैनदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास 500 च्या आसपास आढळत असून आत्तापर्यंत मृत्यूंची संख्या 200 वर गेलेली आहे परिस्थिती खूप आटोक्याबाहेर जात चाललेली असून यासाठी ठोस उपाययोजना तसेच कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालय सर्व खुली करण्यात येण्याची गरज आहे.आपली महात्मा फुले जन आरोग्य योजना या सर्व खासगी रुग्णालयात ही मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करून देण्याची शासनाने सोय करावी जेणेकरून सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळेल तसेच सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये शासनमान्य आपला एक जनसंपर्क अधिकारी ठेवावा जेणेकरून कोणताही त्रास रुग्णाच्या घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना होणार नाही, असे गजानन बाबर यांनी सुचविले आहे.
माजी खासदार गजानन बाबर यांनी केलेल्या महत्वाच्या सुचना अशा –

1. राज्यातील सर्व खाजगी रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत खुली करावी तसेच टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कार्यवाही करावी
2. राज्यामध्ये सरसकट स्थानिक संस्थान मार्फत कोरोना टेस्ट मोफत कराव्यात, टेस्टची संख्या वाढवावी जेणेकरून कोरोनाग्रस्त असणार्‍यांवर ताबडतोब उपचार केले जातील व कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल
3. राज्यातील टाळाटाळ करणाऱ्या खाजगी रुग्णालय वर कारवाई करण्याचे आदेश त्या त्या स्थानिक संस्थांना देण्यात यावेत तक्रार येताच कारवाई करावी तसेच तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम तयार करावी.
4. खाजगी रुग्णालय व शासकीय रुग्णालय यांची बेडची स्थिती आयसीयू ची स्थिती तसेच वेंटिलेटर ची स्थिती वेबसाईट वर प्रदर्शित करावी जेणेकरून रुग्णांना अॅप्रोच होण्यासाठी मदत होईल.
5. राज्यातील सर्व स्थानिक संस्थांना प्रभाग स्तरावर सरसकट कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी आपणा मार्फत आदेश देण्यात यावेत.
6. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी योग्यप्रकारे होते की नाही याचा आढावा घेण्यात यावा खाजगी रुग्णालयाने मान्यता दरापेक्षा जास्त दर घेतल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी व याची कडक् अंमलबजावणी व्हावी व याचा आढावा आपल्या या विभागामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून विभागीय आयुक्तांनी दररोज आढावा घ्यावा असे आदेश आपणा मार्फत देण्यात यावे.
7. रुग्णालयांमध्ये खाजगी असो की शासन मान्यता प्राप्त एकाच दिवशी संशयित रुग्णांना टेस्टचा रिपोर्ट मिळावा अशी अंमलबजावणी व्हावी गर्दी होऊ नये सोशल डिस्टंसिंग पाळावा याची खबरदारी रुग्णालयाने घेण्यात यावी अन्यथा ज्या स्थानिक संस्थेच्या अंतर्गत ते रूग्णालय असेल तेथील प्रमुखावर स्थानिक संस्थांद्वारे कडक कारवाई करण्यात यावी.
8. नागरिकांसाठी कोरोना हेल्पलाइन स्थानिक संस्थेद्वारे चालू करण्यात यावी व याची अंमलबजावणी होते की नाही याची खबरदारी जिल्हाधिकारी यांचे मार्फत घेण्यात यावी .
9. भविष्यात कोरोना परिस्थिती किंवा कोरोना कींवा कोरोना रुग्ण वाढल्यास खाजगी रुग्णालयात बरोबरच खाजगी संस्था महाविद्यालय विविध प्रकारचे हॉल सांस्कृतिक सभागृह ताब्यात घेण्यात यावेत व कोरोना ग्रस्तांसाठी तेथे बेडची सुविधा करण्याचे नियोजन भविष्याचा विचार करून आत्ताच करावे.
10. महात्मा फुले जन आरोग्य योजना याची मुदत 31 जुलै 2020 पर्यंत असून ही मुदत कोरोणा साथीचा प्रादुर्भाव असेपर्यंत वाढवण्यात यावी