महागठबंधनची घोडदौड; BJP आणि RJD मध्ये कांटे की टक्कर

0
174

पाटणा,दि.१०(पीसीबी) – कोरोनाच्या संकटात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मतदानानंतरच्या चाचण्यामध्ये महागठबंधन सत्तेवर येण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, बिहारच्या जनतेनं मतपेटीतून कुणाला कौल दिला आहे? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. बिहारचे सत्ताधीश कोण, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभे केले. प्रत्येक टप्प्यागणिक लढत चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी सत्तांतराला कौल दिला आहे.

बिहारमध्ये 243 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झालीये बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव हेच पुढे आहेत नितीशकुमार NDAचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तर तेजस्वी यादव महागठ बंधन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. नितीश कुमार यांनी प्रचारसभांमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या काळातील ‘जंगलराज’वर वारंवार टीका करत जनतेनं परत एकदा सत्ता द्यावी,असं आवाहन केलं होतं. तर तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक रोजगाराच्या मुद्द्यावर लढली जात असल्याचं म्हटलं आहे.

देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. त्यामुळे देशभरातील विविध शहरात स्थलांतरित झालेल्या बिहारमधील मजुरांचे प्रचंड हाल झाले. त्याचबरोबर घरी गेल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न बिहारमध्ये निर्माण झालेला दिसला. लॉकडाउन आणि त्यानंतर उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत सरकारनं मदत न केल्याचा सूर प्रचारादरम्यान उमटला होता. त्यामुळे या नाराजीचा फटका नितीश कुमार यांना बसू शकतो, अशी चर्चा सुरू होती. सरकारविरोधातील रोष कितपत मतदान यंत्रातून उमटतो, हे बघणंही औत्सुक्याचं असणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडलं. तिन्ही टप्प्यातील प्रचारात आरोपांची चिखलफेक होतानाही बिहारमध्ये दिसून आलं. विशेषतः शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी नितीश कुमार यांनी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत ‘भावने’चं कार्ड खेळलं होतं. त्याचा काही परिणाम दिसून येणार का? याकडेही मतदारांचं लक्ष असणार आहे.