महाआघाडीत मला झुकते माप द्यावे; मनसे आमदार सोनवणेंची अजित पवारांकडे मागणी  

0
813

जुन्नर, दि. २० (पीसीबी) –  राज्यात होणाऱ्या महाआघाडीत मनसेच्या संभाव्य समावेशाची चर्चा सुरू असताना  राज्यातील मनसेचे जुन्नर तालुक्याचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी महाआघाडीत मला झुकते माप द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे केली.  यामुळे आता जुन्नर तालुक्यात पुढील आमदार मनसेचा की राष्ट्रवादीचा  अशी चर्चा सुरू झाली आहे. 

पवारांच्या उपस्थित येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार सोनवणे यांनी राजकीय टोलेबाजी केली. यावर  पवार यांनी ‘तुम्ही आमच्या सूचनेचा विचार करा आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू,’ अशी टिप्पणी केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

सोनवणे पुढे म्हणाले की, मी दादांच्या जवळ आहे. दादा उभ्या महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे मी कुणी वेगळा नाही. चहा पेक्षा किटली गरम अशी तालुक्याची अवस्था झाली आहे. तालुक्यातील लोक हुशार आहेत. मनसे पक्ष केवळ तुम्हालाच कळला, असे दादा म्हणत आहेत, असे सोनवणे यांनी  यावेळी सांगितले.