मराठी मुलांच्या वैद्यकीय प्रवेशाला प्राधान्य द्या; जागा रिकाम्या राहिल्यावरच परप्रांतीयांचा विचार करा- राज ठाकरे

0
378

पुणे, दि. १९ (पीसीबी) – ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षेच्या (नीट) माध्यमातून परप्रांतीय मुले महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भरली जाणार असतील तर आमची त्यावर बारीक नजर असेल हे राज्य सरकारने वेळीच लक्षात घ्यावे. ही धमकी वाटत असेल तर धमकी समजावी,’ असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला. मराठी मुलांना प्राधान्याने प्रवेश देऊन जागा रिकाम्या राहिल्या तरच बाहेरच्यांचा विचार करा, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. बुधवारी पुण्यातून ठाकरे पाच दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर निघाले. तत्पूर्वी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

वैद्यकीय प्रवेशासंदर्भात दरवर्षी अडचणी निर्माण होतात. यंदाही पालक हीच समस्या घेऊन माझ्याकडे आले होते. किती काळ विद्यार्थी-पालकांनी मनस्ताप सहन करायचा, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, नुसत्या वैद्यकीय शिक्षणापुरता पेचप्रसंग नाही. वास्तविक ज्यांची दहावी-बारावी महाराष्ट्रात झाली, जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांनाच स्थानिक शिक्षणात प्राधान्य मिळायला हवे. या नियमाला कर्नाटक, तामिळनाडू सरकारने कायद्याची चौकट दिली. “तामिळनाडूत “नीट’ परीक्षा तामिळ भाषेतून झाली. त्या प्रश्नपत्रिकेत ४९ चुका होत्या. त्याविरोधात तिथला खासदार कोर्टात गेला. कोर्टाने प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी ४ गुण द्यायला लावले. आमचे आमदार-खासदार करतात काय? काही नाही. राज्य सरकारलाही वेळ नाही,’ असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात एवढी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तिथे परप्रांतीय मुले घुसवायची आहेत का? असा सवालही त्यांनी केला.