शेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत – राजू शेट्टी

0
432

पुणे, दि. १९ (पीसीबी) – शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून देण्याच्या आंदोलनाला आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा देतानाच शेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

‘सरकार चर्चेला बोलावून मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. राज्यात आज, गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यासमोर बसवावे,’ असे आवाहनही शेट्टी यांनी बोलताना केले. ‘आमच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने ते अधिक आक्रमक करीत आहोत. शेतकरी खवळला आहे. दूध नाशवंत पदार्थ असल्याने त्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सुमारे सात ते आठ हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना धमकावून कार्यकर्त्यांचा पत्ता विचारला जात आहे. कुटुंबियांना पोलिसांकडून दमदाटी केली जात आहे,’ असा आरोप शेट्टी यांनी केला.

गुजरातच्या सीमेवर ठाण मांडून बसल्याने टँकरने येणाऱा दुधाचा पुरवठा काल रात्रीपर्यंत रोखला होता. त्यामुळे गुजरातमधून रेल्वेने दुधाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे कळाल्याने रेल्वे रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. परिणामी, गुजरातमधून महाराष्ट्राला येणारा दूध पुरवठा खंडित झाला आहे. आमच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने आंदोलन सुरूच राहील, असेही शेट्टी यांनी नमूद केले.