मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ११ आंदोलकांना अटक

0
1426

चाकण, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ३० जुलैला चाकण येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी ११ आंदोलकांना अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या पथकाने केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे ३० जुलैरोजी हिंसाचार झाला होता. सुमारे ४ ते ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. आंदोलकांनी येथे वाहनांची तोडफोड करीत  पोलीस चौकीची जाळपोळही केली होती. यामध्ये ३० बस जाळण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश होता. दंगल घडली तेव्हा चाकण परिसर हा पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत होता. तेव्हा ग्रामीण पोलिसांनी ३० जणांना अटक केली होती.

मात्र हा परिसरत आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत येत असल्याने पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली असून अकरा आंदोलकांना अटक केली आहे.