आता ओळखपत्र दाखवल्यास चार तासांत पॅनकार्ड मिळणार

0
783

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – आता पॅनकार्ड काढण्यासाठी जास्त दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. करदात्यांसाठी महत्त्वाचे असलेले पॅनकार्ड चार तासांमध्ये मिळण्याची सोय उपल्बध करून देण्यात येणार आहे. सध्या पॅन कार्डसाठी किमान १० दिवस लागतात. मात्र, आता ओळखपत्र दाखवून अवघ्या चार तासांत ई- पॅन मिळणार आहे. त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्र यांनी येथे दिली.

करसंकलन आणि पॅन कार्डबाबत माहिती देताना सुशील चंद्र म्हणाले की, वर्षभरात चार तासांमध्ये पॅन कार्ड देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि ओळख पटवून झाल्यावर चार तासांच्या अवधीत ई पॅन दिले जाईल. यासाठी वर्षभरात यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर निर्धारण वर्ष २०१८-१९ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्येत तब्बल ५० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे दिसून येत असून, एकूण ६.०८ कोटी विवरणपत्रे करदात्यांनी भरल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षांत, वस्तू आणि सेवा करातून अपेक्षेपेक्षा कमी महसूल येणार असला तरी, प्रत्यक्ष कराचे ११.५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास चंद्र यांनी व्यक्त केला.