ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत कामगारांना अन्न-पाण्याचा साठा पुरवण्याची केली मागणी

0
428

 

मुंबई, दि.३१ (पीसीबी) – मिरा रोड परिसरातील मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागूनच गेल्या दीड वर्षांपासून जे. पी. इन्फ्रा या प्रसिद्ध विकासकाच्या इमारतीचे बांधकामं सुरु आहे. यासाठी प्रामुख्याने पश्चिम बंगाल येथील कामगार काम करीत आहेत. मात्र, राज्यात लॉकडाउन झाल्याने या कामगारांना या भागातच झोपडी बांधून घरी बसण्याची वेळ आली. दरम्यान, विकासक जे. पी. इन्फ्राने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता या कामगारांच्या मदतीला चक्क पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनीच धाव घेतली आहे.

बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत या कामगारांना अन्न-पाण्याचा साठा पुरवण्याची मागणी केली आहे.

मिरा रोड परिसरातील प्रसिद्ध विकासक जे. पी. इन्फ्रा याने आपल्या कामगारांना गेल्या सात दिवसांपासून वाऱ्यावर सोडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या विषयी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र शासनाकडे कामगारांना आवश्यक ती मदत देण्याची मागणी केली आहे.

 

ममता बॅनर्जींकडून अशा प्रकारे विनंती आल्यानंतर राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कामगारांची भेट घेतली. यावेळी या कामगारांना गेल्या २ महिन्यांपासून पगारही झाला नसल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे देखील शक्य नसल्याचे समोर आले. दरम्यान, या कामगारांना राज्य शासनाकडून जेवण आणि अत्यावश्यक सेवा पुरविण्याकरिता सरनाईक यांनी कामगार विभागाकडे मागणी केली. त्यानंतर संतोष गोसावी या अधिकाऱ्यांनी कामगारांची भेट देऊन त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली.राज्य शासनाकडे नोंदणी असलेल्या या २०० कामगारांना वगळून इतर कामगारांची देखील नोंदणी करण्याचे कामे सध्या सुरु आहे.