मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंची आगामी पालिका निवडणुकीसाठी जंगी तयारी; 2022 च्या निवडणुकीसाठी व्हॅली जीप

0
379

पुणे, दि.१२ (पीसीबी) : पुढे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर आहे. कारण मागील काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात वाढ झाली आहे. राज ठाकरे सातत्याने पुण्यात येऊन मनसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून येते.

मनसेच्या शिलेदार रुपाली पाटील ठोंबरे यांची मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांनीही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. रूपाली पाटील ठोंबरे यांनी नुकतीच आपल्या फेसबुक अकाउंट वर एक पोस्ट टाकली. ज्यामध्ये त्या व्हॅली जीपमध्ये बसल्याचे दिसत आहे. ही जीप माझ्या पतीने जन्मदिवसानिमित्त 2022 च्या निवडणुकीसाठी भेट दिल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

रूपाली पाटील ठोंबरे यांची ओळख मनसेचा आक्रमक चेहरा अशी आहे. पक्ष स्थापनेपासून त्या मनसेत कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. मात्र 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

त्यांनी पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा म्हणून जबाबदारी पार पाडली. काही दिवसांपूर्वीच त्यांची निवड मनसेच्या राज्य उपाध्यक्ष पदी करण्यात आली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्या कसबा पेठ मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र पक्षाने त्यांना या भागातुन उमेदवारी दिली नव्हती.