मगर स्टेडियमच्या प्रश्नावर कामगार मंत्र्यांची सकारात्मक भुमिका – भारती चव्हाण

0
451

पिंपरी, दि.२० (पीसीबी) –  पिंपरीतील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये मागील २७  वर्षांपासून प्रलंबित असणारा करार सर्व अटी शर्तीसह पुर्ण करावा. यासाठी मागील अनेक वर्षांपासून गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईच्या माजी सदस्या भारती चव्हाण या पाठपुरावा करीत आहेत. चव्हाण यांनी आज रविवारी (दि. १९) पुण्यातील सर्किट हाऊस येथे कामगार प्रतिनिधी समवेत कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापुढे या विषयी गा-हाणे मांडले. कामगार मंत्री यांनी हा पुर्ण विषय आपण मार्गी लावू व कामगारांच्या न्याय हक्कांचे रक्षण करु असे सांगून या विषयावर सकारात्मक भुमिका घेतली. यावेळी भारती चव्हाण यांनी कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमचा विषय सोमवारी (२० जानेवारी) होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करावा हि कामगार कल्याण मंडळाची प्रमुख मागणी असल्याचे कामगार मंत्र्यांना सांगितले. या शिष्ठमंडळात राज अहिरराव (रस्टन कंपनी), तान्हाजी एकोंडे (थरमॅक्स कंपनी), भरत शिंदे (टाटा मोटर्स), काळूराम लांडगे (पीएमपीएमएल) आदींचा समावेश होता.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सहकामगार आयुक्त चंद्रकांत राऊत आणि सहकामगार कल्याण आयुक्त समाधान भोसले यांना सर्किट हाऊस येथे बोलावून घेतले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाशी या विषया बाबत ताबडतोब संपर्क साधण्याचे आदेश दिले. या विषयी अधिक माहिती देताना भारती चव्हाण यांनी सांगितले की, कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामध्ये मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असणारा कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमचा विषय सोमवारी (२० जानेवारी) होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करावा अन्यथा शहरातील हजारो कामगार बेमुदत धरणे आंदोलन करतील असा इशारा आयुक्त व महापौर यांना दोन दिवसांपुर्वी दिलेल्या पत्रात दिला आहे.

कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामध्ये १९९२ साली झालेल्या करारानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास एक कोटी रुपये व शहरात पाच ठिकाणी पाच भुखंड (एकुण ६ एकर) जागा देण्याचे ठरले होते. त्यानुसार १९९३ मध्ये दळवीनगर येथील वीस हजार स्क्वेअर फुटांचा एक भूखंड व एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, ऊर्वरीत भूखंड आजपर्यंत दिलेले नाहीत. मागील अनेक वर्षांपासून कामगार मंत्री, कामगार कल्याण मंडळ अध्यक्ष, सदस्य, शहरातील कामगार नेते आणि लोकप्रतिनीधी व कामगार कार्यकर्ते आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या अनेक बैठका झाल्या. चर्चा, बैठकांमुळे विनाकारण वेळ वाया गेला त्यामुळे कामगार व कामगारांचे कुटुंबिय त्यांना मिळणा-या सेवा, सुविधांपासून वंचित राहिले आहेत. दरम्यानच्या काळात महानगपालिकेने कामगार कल्याण मंडळात ठरलेल्या करारानुसार अद्यापपर्यंत जमीन हस्तांतरीत केलेली नसतानाही कै. अण्णासाहेब मंगर स्टेडियमचा पुर्नविकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. यास गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या वतीने हरकत घेण्यात आली आहे.  सोमवारी दि. २० जानेवारी २०२० रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भूखंड महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला हस्तांतरीत करण्याविषयीचा ठराव मंजुर करुन जागेचे हस्तांतरण करारानुसार व्हावे अशी कामगारांची मागणी आहे. हा ठराव मंजूर न झाल्यास गुणवंत कामगार कल्याण परिषद, कामगार नेते व शहरातील हजारो कामगार महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन करतील, असा इशारा कामगार प्रतिनिधींनी दिला असल्याचे भारती चव्हाण यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.