भोसरी मतदारसंघ; महेश लांडगे यांना आव्हान देण्यासाठी राजकीय भूंकपाची शक्यता

0
1550

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून हमखास आघाडी मिळेल, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. मात्र या दाव्यामुळेच विधानसभा निवडणुकीवेळी युतीत अडचणी येण्याची चिन्हे आहेत. भाजप संलग्न अपक्ष महेश लांडगे भोसरीचे विद्यमान आमदार आहेत. ते विद्यमान असल्याने उमेदवारीवर त्यांचाच दावा आहे. मात्र विधानसभेसाठी भाजपकडून एकनाथ पवार, शिवसेनेकडून सुलभा उबाळे, इरफान सय्यद यांची नावे स्पर्धेत आहेत. तसेच राष्ट्रवादीतील काही तगडे इच्छुक शिवसेनेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे भोसरी मतदारसंघात ऐन निवडणुकीत राजकीय भूकंपाची चिन्हे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत नाही, तोच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी निवडणूक तयारीत आघाडी घेतली आहे. निवडणुकीसाठी त्यांनी वॉर रुम सुरू केली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, त्यांच्या पत्नी व माजी महापौर मोहिनी लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. भाजपकडून विद्यमान आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माथाडी कामगारांचे नेते इरफान सय्यद यांची नावे चर्चेत आहेत.

मनसेकडून गटनेते सचिन चिखले यांचे नाव इच्छुकांमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने विधानसभा निवडणुकीतही युती होईल, अशी अपेक्षा शिवसेनेला असल्याने पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी मतदारसंघावर शिवसेना दावा करू शकते. आजमितीला ४ लाख १३ हजार ६८० मतदार असलेल्या या मतदारसंघात चिखली, पूर्णानगर, रुपीनगर-तळवडे भागात मराठवाड्यातील मतदारांचे प्रमाण अधिक आहे. कुदळवाडी व आसपासच्या परिसरात मुस्लिम तसेच इतर भागात परराज्यातील मतदारांचे प्रमाण मोठे आहे. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची ताकद मोठी असली तरी लाटेत देखील येथील मतदार अपक्षाला निवडून देतात, हा इतिहास आहे.

त्यामुळे निवडणुकीसाठी सोप्या असलेल्या या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतील काही तगडे इच्छुक शिवसेनेकडे डोळे लावून बसले आहेत. विधानसभेसाठी युती होऊ नये म्हणून या इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. युती नाही झाली तरी आणि झाली तरी ऐन निवडणुकीच्या वेळी भोसरी मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. या मतदारसंघाचा तो इतिहासच आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची फेरी पूर्ण केली असून, आतापासूनच त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यांना धक्का देण्याची ताकद कोणात आहे, हे निवडणुकीच्या वेळी स्पष्ट होईल.