माजी सहसंस्थापकच म्हणतोय फेसबुक बंद झाले पाहिजे

0
874

न्युयॉर्क, दि. ११ (पीसीबी) – फेसबुकचे माजी सहसंस्थापक ख्रिस ह्यु यांनी लोकप्रिय सोशल नेटवर्क ‘फेसबुक’ आता बंद करायला  हवे, असे मत व्यक्त केले आहे. न्युयॉर्क टाईम्स मध्ये प्रसिध्द झालेल्या लेखात ख्रिस यांनी आपले मत नोंदवले आहे. या लेखात त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केवळ वाढ आणि विस्तारावर लक्ष केंद्रित केल्याने झुकरबर्ग यांना सुरक्षा आणि सभ्यतेशी तडजोड करावी लागत आहे, असेही त्यांनी या लेखात  म्हटले आहे. झुकरबर्ग  केवळ फेसबुकच नव्हे ,  तर ‘व्हॉट्स अॅप’आणि ‘इन्स्टाग्राम’देखील नियंत्रित करत आहेत. त्यामुळे फेसबुकचे सल्लागार मंडळ आपले काम सोडून केवळ आपल्या प्रमुखाची कार्यक्षमता पाहात बसले आहेत, असे ते म्हणाले.

झुकरबर्ग यांचा एकछत्री अंमल ही फेसबुकची सर्वांत मोठी त्रुटी आहे. त्यांच्या क्षमतेचे नियोजन करण्यासाठी आणि दोन अब्ज लोकांच्या संवादाचे परीक्षण करण्यासाठी तेथे अध्यक्षाच्या दर्जाची एकही व्यक्ती नाही. फेसबुक बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेतील राजकीय नेत्यांच्या विधानालाही ख्रिस यांनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, ख्रिस ह्यु यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या मदतीने २००४मध्ये फेसबुकची स्थापना केली होती.  त्या वेळी ते दोघे हॉर्वर्ड विद्यापीठात शिकत होते आणि एका छोट्या खोलीत या  ‘ऑनलाइन नेटवर्क’ला  सुरुवात झाली होती. ख्रिस यांनी फेसबुक  सोडून दहा वर्षांहून  अधिक काळ लोटला  आहे.