भोसरीत १५ लाखांचा एक क्विंटल गांजा जप्त

0
361

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – कारमधून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला तब्बल १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीच्या १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली.

अतिक युनूस शेख (वय २७, रा. दिल्ली नाका, मोगल टेकडी, ता. संगमनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर) पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील ई क्षेत्रीय कार्यालायशेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.