भोसरीत स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे ठेवल्याने शॉक लागून पादचाऱ्याचा मृत्यू; मनपाचे विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

0
884

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असताना स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे असल्याने शॉक लागून पादचाऱ्या तरुणाचा पत्नीसमोरच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.२ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास भोसरी येथील नाशिक हायवेवर रोशन गार्डनसमोर घडली.

चेतन जाधव (वय २४, रा. बि.१३/२२, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी किरण यांनी भोसरी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.१७ नोव्हेंबर) तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, निष्काळजीपणा करुन स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे ठेवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास मयत चेतन आणि त्यांची २१ वर्षीय पत्नी किरण हे दोघेही भोसरी येथील नाशिक हायवेवरील रोशन गार्डनसमोरील रस्ता ओलांडत होते. यावेळी तेथील स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे असल्याने त्यांचा जोरदार शॉक चेतन यांना लागला आणि ते जागीच बेशुध्द पडले. किरण यांनी लोकांच्या मदतीने चेतन यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे किरण या धक्क्यात होत्या यामुळे त्यांनी शनिवारी उशीरा निष्काळजीपणा करुन स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे ठेवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.