भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीतून अटक

0
966

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – रविदास मंदिर अनधिकृत असल्याचे सांगत तोडण्याची कारवाई करण्यावरून रामलीला मैदानात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आहे.

रविदास मंदिर तोडण्याच्या विरोधात रामलीला मैदानात बुधवारी सायंकाळी दलित आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमले होते. हजारो लोकांनी तोडलेल्या मंदिराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दरम्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तुगलकाबाद रोडवर १०० हून अधिक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.

आंदोलक हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर लाठीचार्जही करण्यात आला. यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी रात्री उशिरा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांना अटक केली.