भावाच्या लग्नासाठी वाल्हेकरवाडीतील ‘त्या’ चिमुकल्याचे अपहरण; चार दिवसात वाकड पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका करुन दोघांना केले अटक

0
2516

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – कर्ज आणि भावाच्या लग्नासाठी पैसे हवे असल्याने दोघा आरोपींनी मिळून चिंचवड वाल्हेकरवाडी येथील कुणाल सोसायटीमध्ये राहणारा पाच वर्षीय चिमुकला सुफियान नासिर खान याचे रविवारी (दि.४) अपहरण करुन त्याच्या घरच्यांना पाच लाखांची खंडणी मागीतली होती. मात्र वाकड पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्याचा छडा लावत दोघा आरोपींना अटक करुन सुफियान याला सुखरुप आपल्या आई-वडिलांकडे सोपवले.

शाहरुख मिराज खान (वय २६) आणि मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्याच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुफियान हा कुणाल सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत होता. यादरम्यान शाहरुख दुचाकीवरुन तिथे पोहोचला. त्याने सुफियानला सोबत यायला सांगितले. शाहरुख ओळखीचा असल्याने सुफियान त्याच्यासोबत फिरायला गेला. तर मोहम्मद हा दुकानात थांबला होता. सुफियानचे आई-वडील काय करतात यावर लक्ष ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. दोन दिवसांनी शाहरुखने सुफियानच्या आईला फोन करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. ७ नोव्हेंबर रोजी पैसे घेऊन चिंचवडमधील बस स्थानकात या, असे त्याने सुफियानच्या आईला सांगितले होते. यानुसार पोलिसांनी सापळा रचून शाहरुखला अटक केली.

चौकशी दरम्यान, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या शाहरुख मिराज खान (वय २६) या तरुणाचे झम झम केटरर्स आणि बिर्याणी हाऊस आहे. शाहरुखच्या दुकानाच्या बाजूला सुफियान याच्या आईचे ब्यूटी पार्लरचे दुकान आहे. सुफियानही आईसोबत ब्यूटी पुार्लरमध्ये येत असल्याने त्याची शाहरुखशी ओळख झाली होती. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुफियान त्याच्या आईवडिलांसह राहत होता. सुफियानच्या आईने वेळोवेळी शाहरुखला आर्थिक मदत केली होती. पण आता मदत करणार नाही, असे तिने शाहरुखला सांगितले होते. शाहरुखच्या लहान भावाचे लग्न ठरले होते. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात लहान भावाच्या लग्नासाठी पैशांची गरज अशा संकटात शाहरुख सापडला होता. यातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने सुफियानच्या अपहरणाचा कट रचला. त्याने मुंबईतून मोहम्मद  खान  या मित्राला बोलावून घेतले आणि हा कट रचल्याचे पोलिसांना सांगितले.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वाकडमधील नऊ पोलीस अधिकारी आणि जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.