भारत विरूद्ध पाकिस्तान आज महामुकाबला

0
424

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक लक्ष ज्या लढतीवर केंद्रित असते त्या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आणि त्यांचे चाहते पूर्णपणे सज्ज आहेत. अर्थात, जेवढे लक्ष या लढतीकडे आहे तेवढेच पावसाकडेही. या लढतीवर पावसाचे सावट असल्यामुळे ती लढत वाया जाऊ नये अशी प्रार्थना दोन्ही देशांचे खेळाडूतसेच चाहतेही करत आहेत. उद्या येथे पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याचा फटका बसल्यास जगभरातील चाहत्यांचा पुरता हिरमोड होऊ शकतो.

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय येऊ शकतो. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २.३० वाजता नाणेफेक होणार असून त्यादरम्यान पावसाची शक्यता ४३ टक्के इतकी आहे. पाऊस असल्यास नाणेफेकीला उशीर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन वाजता (स्थानिक वेळ १०.३० वाजता) हा सामना सुरू होणे अपेक्षित आहे. तीन वाजता ४३ ते ४७ टक्के पावसाची शक्यता असून वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी, असे साकडे सगळेच घालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रविवारी मँचेस्टरचं हवामान कसं राहणार, याबाबत भारतीय चाहते गुगलवरही मोठ्या प्रमाणात सर्च करताना दिसत आहेत.