राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज; विखे, शेलार यांना मंत्रिपद?

0
459

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा आज सकाळी ११ वाजता विस्तार होत आहे. या विस्तारात १३ नवे चेहरे फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे सूत्रांनी सांगितले. यात भाजपचे १०, शिवसेनेचे २ तर रिपाइंचा एक मंत्री असेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपकडून कॅबिनेट मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे तर शिवसेनेतर्फे जयदत्त क्षीरसागर यांची नावे अंतिम होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेतर्फे राज्यमंत्री म्हणून तानाजी सावंत अथवा राजेश क्षीरसागर यांची वर्णी लागू शकते. रामदास आठवले गटाने राज्यमंत्रिपदासाठी अविनाश महातेकर यांचे नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे. त्याचवेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री भाजपचे आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीकडे नजर ठेवून युतीतील प्रमुख नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला संमती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून उद्धव यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. भाजपमध्ये कुणाला संधी द्यायची याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मध्यरात्रीपर्यंत विचारविनिमय सुरू होता.