भारतीय खेळाडूंना कुणी अडवू शकत नाहीत

0
181

नवी दिल्ली, दि. १5 (पीसीबी) – जपानने वाढत्या कोविड १९ संसर्गाच्या प्रादुर्भावाने भारत, पाकिस्तान आणि नेपाळ देशातील प्रवाशांवर बंधने घातल्यामुळे भारतीय खेळाडू ऑलिंपिकसाठी जपानला कसे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, भारतीय ऑलिंपिंक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बात्रा यांनी सर्व शिष्टाचार आम्ही पाळ आहोत, त्यामुळे भारतीय खेळाडूंना कुणी अडवू शकत नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना बात्रा म्हणाले,’जपानने घातलेल्या नव्या बंधनामुळे खेळाडूंच्या जपानला जाण्यावरून प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे. पण, मी आज खात्री देतो की भारताचा प्रत्येक ऑलिंपिक पात्र खेळाडू जपानला जाणार.’ बात्रा यांनी आपली मुत्सदेगिरी येथे दाखविली असून, ते आता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला कोंडित पकडत आहेत.

ते म्हणाले,’भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशातील नागरिकांनी जपानला जाणे आणि ऑलिंपिकसाठी खेळाडूंनी जपानला येणे यात फरक आहे. यजमान देश आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांच्यापैकी कुणी ऑलिंपिक पात्र खेळाडूला अडवू शकत नाही. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले एकूण २१० खेळाडू या बंधनाखाली येऊ शकत नाहीत. आम्ही सर्व शिष्टाचार जाणून आहोत आणि त्याचे पालन करत आहोत.’

ऑलिंपिकला दोन महिने राहिले आहेत. खेळाडूंनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून ऑलिंपिक सरावावर लक्ष केंद्रित करावे. कुणाही खेळाडूला अडवले जाणार नाही. हा माझा शब्द आहे.
– डॉ. नरिंदर बात्रा

भारताचा प्रत्येक ऑलिंपिक आणि पॅरा ऑलिंपिक पात्र खेळाडूंचे लशीकरण झालेले असेल, तसेच त्याच्याबरोबर असलेले ९० पदाधिकारी यांना देखील लस दिलेली असेल. लशीकरणाच्या शिष्टाचाराबरोबर आम्ही जपानला निघण्यापूर्वी २४ तास खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी घेणार आहोत. अशा सर्व अटी आणि शिष्टाचार पाळल्यावर कुणी भारतीय खेळाडूंना अडवू शकेल असे वाटत नाही. अधिस्विकृती असलेला प्रत्येक खेळाडू आणि पदाधिकारी हा जपानला जाणार, असेही बात्रा यांनी सांगितले.

काही खेळांच्या पात्रता स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंच्या ऑलिंपिक पात्रतेवर परिणाम झाला आहे. याबाबत आमच्यापेक्षा त्या खेळाची संघटना अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष घालू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापबाबत भूमिका अधिक स्पष्ट करताना बात्रा म्हणाले,’गेले वर्षभर बघितले तर सगळीकडेच परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कधी आणि कुणाला संसर्ग होईल हे कुणीच सांगू शकत नाही. जे काही निर्णय झाले आहेत, ते खेळाच्या भूमिकेतून झालेले नाहीत. त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. देशाने जर निर्णय घेतला असेल, तर मी काही करू शकत नाही. थायलंड आणि मलेशिया सरकारनेच बंधने आणली आहेत. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. ‘

ज्या खेळात ऑलिंपिक पात्रतेचा प्रश्न आहे, तेथे जागतिक मानांकनाचा विचार करण्यात यावा. हे दुर्दैवी आहे. पण, कधी कधी परिस्थितीनुसार बदलावे लागते. अशा दुर्दैवी घटनाने जे खेळाडू पात्र ठरू शकले नाहीत त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती आहे, असेही ते म्हणाले.