भारताच्या अंशु मलिकला सुवर्णपदकाची संधी

0
220

पुणे,दि.१६(पीसीबी) – भारताची महिला कुस्तीगीर अंशु मलिक हिने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना सर्बिया बेलग्रेड येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंशुच्या कामगिरीने या स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा पूर्ण होणार आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अनेक देशांच्या संघांवर सहभागासाठी मर्यादा येत असल्याचे लक्षात आल्यावर जागतिक कुस्ती महासंघाने या वर्षीच्या जागतिक स्पर्धा रद्द केल्या होत्या. मात्र, मल्लांच्या तयारीचे महत्व लक्षात घेता त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक कुस्ती स्पर्धा होणाऱ्या बेलग्रेड येथेच ही स्पर्धा घेण्याचे ठरले होते.

या स्पर्धेतील सहभाग ऐच्छिक होता. भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागातील सर्व दहा वजनीगटात आपला संघ पाठवला होता. ग्रीको रोमन प्रकारात भारताला अपयश आले. पण, महिलांनी पदकासाठी सर्वस्व पणाला लावले. यातही अंशुने ५७ किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठताना भारताचे किमान रौप्यपदक निश्चित केले. अंशुने पहिल्या फेरीत अझरबैजानच्या अल्योना हिला अटीतटीच्या लढतीत गुणांवर ४-२ असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत तिने जर्मनीच्या लारा सेरतेनेसला गुणांवरच ३-१ असे पराभूत केले. अंशुने पुढे उपांत्य फेरीत रशियाच्या तुल्यबळ प्रतिस्पर्धी वेरोनिकला ७-४ असे पराभूत केले. अनुभवी वेरोनिक हिला उपांत्य फेरीत पराभूत केल्यामुळे आता सुवर्णपदकासाठी तिला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

दरम्यान विजेतेपदासाठी तिची गाठ आता मालदिवच्या निचिता हिच्याशी होणार आहे. अन्य एका वजनी गटात भारताची पिंकी ब्रॉंझपदकापासून वंचित राहिली. ब्रॉंझपदकाच्या लढतीत तिला रशियाच्या ओल्गा खोरेशावेत्सेवा हिच्याकडून १०-० असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.