“काही मंत्री ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहे”

0
229

मुंबई,दि.१६(पीसीबी) – मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. काही मंत्री ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

मेटे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही. त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

दरम्यान ‘2 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 5 मिनिटेही चर्चा केली नाही. विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा उपस्थित केला. पण त्यांना आणि मलाही बोलू दिलं नाही. उद्धव ठाकरे म्हणतात मराठा आरक्षण कायम ठेवू. पण कसं ठेवणार यावर कुणीच बोलत नाही. फक्त पोकळ आश्वासन देण्याचं काम सरकार करत आहे,’ असा आरोप मेटे यांनी केला आहे.