भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय; मालिकेत बरोबरी

0
590

अॅडलेड, दि. १५ (पीसीबी) – कर्णधार विराट कोहलीचे शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू व ६ गडी राखून विजय मिळवला. शॉन मार्शचे (१३१ धावा) शतक व्यर्थ ठरले. अखेरच्या षटकात ७ धावांची गरज  असताना  धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे.   

ऑस्ट्रेलियाच्या २८८ धावांचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा  या सलामीच्या जोडीने   आक्रमक सुरूवात केली. फटाकेबाजी करताना  धवन ३२ धावांवर बाद झाला.  त्यानंतर  रोहितही फटके मारण्याच्या नादात ४३ धावांवर बाद झाला. अंबाती रायडूनेही बऱ्यापैकी फलंदाजी केली. त्याने २४ धावा केल्या.

विराटने महेंद्रसिंह धोनीच्या साथीत आपल्या कारकीर्दीतील  ३९ वे तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचे ६ वे शतक पूर्ण केले. त्याने ५ चौकार व २ षटकार लगावले.  त्यानंतर धोनीने आक्रमक पवित्रा घेत दिनेश कार्तिकच्या मदतीने  धावांचा पाठलाग केला.  ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, रिचर्ड्सन, स्टॉयनिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

शॉन मार्श (१३१ धावा), ग्लेन मॅक्सवेलच्या (४८ धावा) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने  ५० षटकात टीम इंडियाला २९९ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २९८ धावा केल्या.   टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत ४ बळी टिपले. मोहम्मद शमीने ३ बळी घेतले. रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.