पॉवरफुल पवार कुटुंबाचे शिरूर मतदारसंघात केवळ राजकीय पर्यटन; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र

0
654

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली असतानाही शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे उमेदवारच नसल्याचे पाहायला मिळते. तरी देखील या मतदारसंघात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक पॉवरफुल घराणे असलेल्या पवार कुटुंबातील सर्वांनी गेल्या एक-दोन महिन्यात हजेरी लावली आहे. आधी खासदार सुप्रिया सुळे, नंतर जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, त्यानंतर आमदार अजितदादा पवार यांनी शिरूर मतदारसंघात सभा घेतल्या. आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी (दि. १६) शिरूरमध्ये येणार आहेत. परंतु, संपूर्ण पवार कुटुंब शिरूर मतदारसंघात आणखी कितीवेळा राजकीय पर्यटन करणार आहेत?, असा सवाल पक्ष कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच यंदाही राजकीय बळी ठरणारा उमेदवार देणार असाल, तर राष्ट्रवादीच्या मागे कशाला उभे राहायचे? अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.