”भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय”

0
407

कोल्हापूर, दि. २१ (पीसीबी) : प्रशांत किशोर यांच्यासारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत दीर्घ बैठक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा दिल्लीत दोघांमध्ये बैठक झाली. त्यावरुन पडळकरांनी टीकास्त्र सोडलं.

समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याची व्यवस्था राज्य सरकार करतंय. ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण नाकारलं गेलं. तारखा पुढे ढकलण्याशिवाय राज्य सरकारने काही केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता, असं पडळकर म्हणाले.
भाजपने 26 जूनला चक्का जामची हाक दिली आहे. प्रस्थापितांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवलं. यापुढे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असा आरोपही पडळकरांनी केला.

हे चुलता पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार आहे. मागासवर्गीय उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे होऊ शकतात? हा मनमानी कारभार चालला आहे. उपसमितीचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं. कोणतीही चर्चा न करता त्यांनी काम केलं, हे काँग्रेसवालेच सांगत आहेत. मराठा समाजाच्याही ताटात माती टाकायचं काम यांनी केलंय. बहुजनांवर अन्यायाचं षडयंत्र या सरकारने रचलंय. काँग्रेस मूग गिळून गप्प बसलंय. त्यांचं काका पुतण्या पुढे काही चालत नाही, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. मग आंबेडकरांना मानणारे काँग्रेसवाले राजीनामा का देत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला. तसंच भाजपच्या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं, सरकारला हादरा दिला पाहिजे, असं पडळकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला कोणताही विषय उठसूट केंद्राकडे नेण्याची सवय आहे. कोरोनाकाळातही यांनी हेच काम केलं, असंही पडळकर म्हणाले.