पावसाळ्यातील खोदाईमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – संजोग वाघेरे पाटील

0
332

– अपघात टाळण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

– सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करणा-यांवर कारवाई कारा

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यातही सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे अपघातांचा धोका निर्माण होऊन शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण ऐरणीवर आला आहे. रस्ते खोदाई तातडीने बंद करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणा-या संबधितांविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेेरे पाटील यांनी केली आहे. महापालिकेकडून कामांच्या नावाखाली शहरवासीयांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

रोधात कारवाई या संदर्भा संजोग वाघेरे पाटील त्यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वास्तविक पाहता पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात खोदाईशी संबधित कोणतीही कामे करणे उचित नाही. तरी देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कामासाठी खोदाई सुरू आहे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सर्वाधिक रस्ते खोदण्यात आले आहेत. काही भागात ड्रेनेज, पावसाळी गटारे, पाणीपुरवठा वाहिन्यांसाठी मोठ मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या खोदाई धोरणाप्रमाणे नियम, अटी -शर्तीचे पालन आणि सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली जात नाही.
मोठ्या कामांबरोबर शहरातील सर्वच भागात अर्बन स्ट्रीट, सिमेंट रस्त्यांची कामे, तसेच किरकोळ दुरुस्तीची कामेही चालू आहेत. रस्त्यावर पडलेले चर योग्य पध्दतीने बुजविले जात नाहीत. परिणामी, थोड्या पावसात रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यांची अवस्था दैयनीय झालेली आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करत सद्यस्थितीत कामे सुरू आहेत. वास्तविक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी, ड्रेनेज, पाणीपुरवठाविषयक अत्यावश्यक कामांसह इतर कामांना निर्बध असतानाही परवानगी देण्यात आली होती. तरी देखील मुदतीत कामे पूर्ण न करता पावसाळ्यात शहरवासीयांचा जीव धोक्यात घालण्याचे काम महानगरपालिका करत आहेत.

पावसाळ्यात खोदाई, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेले अपघात नागरिकांच्या जिवावर बेतणारे ठरले आहेत. त्यामुळे अधिकारी, कंत्राटदार किंवा इतर कोणाच्या हितापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात रस्ते खोदाईशी संबधित सर्व कामे तातडीने बंद करून नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा. सद्यस्थितीत सुरू असलेल्या खोदाईच्या ठिकाणी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणा-या संबधितावर महानगरपालिकेच्या धोरणानुसार योग्य कारवाई करावी, अशी संजोगे वाघेरे पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे