भाजप व आमदार जगतापांवर आजपर्यंत राजकीय हेतूने आरोप केले; श्रीरंग बारणे यांची कबुली, बारणे-जगतापांमध्ये दिलजमाई

0
1083

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षांत आमचा मित्र पक्ष भाजप आणि या पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आजपर्यंत केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि निराधार होते. राजकीय हेतूने मी हे आरोप केले होते, अशी कबुली शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. ८) दिली. महापालिकेच्या कारभारावरही मी राजकीय हेतूनेच टिका केली होती. भाजप हा आमचा मित्र पक्ष असल्यामुळे यापुढील काळात आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाहीत, याची मी पुरेपूर काळजी घेईन. तसेच आमदार लक्ष्मण जगताप व भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच यापुढील माझी वाटचाल राहिल, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेविका उमा खापरे, माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.

यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पाठबळामुळेच मला मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याची संधी मिळाली. भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या निःस्वार्थ कामांमुळे माझा विजय सोपा झाला. खासदार झाल्यानंतर मी भाजप आणि त्या पक्षाच्या नेतृत्वावर राजकीय द्वेषापोटी अनेक बिनबुडाचे आरोप केले आहेत.

महापालिकेत आम्ही सगळे भाऊ सारे मिळून खाऊचा कारभार सुरू असल्याचे आणि ब्लॅकमेलिंग करणारेच आता कारभारी झाल्याचे मी आरोप केले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पिंपरी-चिंचवड शहर बदनाम होत असल्याचेही मी म्हटले होते. त्याचप्रमाणे शहरातील अतिक्रमणधारकांकडून राजकीय लोक हप्ते घेत असल्याचा आरोपही मी केला होता. मित्रपक्ष भाजपने समाविष्ट गावांतील रस्त्यांच्या विकासासाठी ४२५ कोटी रुपये मंजूर केले. त्यामध्ये देखील ९० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी व माझ्या सहकाऱ्यांनी केला होता. त्याचबरोबर शहरातील घरोघरचा कचरा उचलण्याच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला होता. परंतु, आम्ही केलेला हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित होता.

महापालिकेतील भाजपच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी एक प्रसिद्धीपत्रक काढून शहरवासीयांची भाजपकडून निराशा झाल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात भाजपने महापालिकेच्या माध्यमातून शहरात अनेक चांगली विकासकामे केली आहेत. शास्तीकराच्या मुद्द्यावरूनही मी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले होते. प्रत्यक्षात हा कर म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने लादलेला जिझिया कर आहे. भाजपने पिंपरी-चिंचवडवासीयांची शास्तीकरातून सुटका करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आमदार जगताप यांनी भाजपच्या माध्यमातून शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केलेले सर्व आरोप व टिका बिनबुडाचे होते. केवळ राजकीय हेतूने मी आरोप केले होते. आमदार जगताप यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन मी टिका करणे उचित नव्हते. भाजप पदाधिकाऱ्यांसोबतच्या सर्व मतभेदांना मूठमाती देऊन आम्ही सर्वजण एक नवीन सुरूवात करणार आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण एकदिलाने काम करून मावळ मतदारसंघात भगवा फडकवणार असल्याचे त्यांनी सांगितले.”