पिंपरी चिंचवडच्या भाजप नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता, केव्हाही स्फोट होण्याची शक्यता !

0
882

– २७ जेष्ठ नगरसेवकांना चार वर्षात एकही मोठे पद नाही

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. भाजपने सर्व नगरसेवकांना पदे देणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र चार वर्षात तब्बल २७ मोजक्या जेष्ठ नगरसेवकांना प्रभाग अध्यक्ष, विषय समिती सभापती अशा पदांपासून वंचित ठेवले आहे. महापालिकेतील साधीसाधी पदेही मिळत नसल्याने या नगरसेवकांमध्ये आता प्रचंड अस्वस्थता असून केव्हाही त्याचा मोठा स्फोट होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या नाराज नगरसेवकांना गळ टाकल्याची माहिती बाहेर आली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची निर्विवाद सत्ता आली. भाजपचे तब्बल ७६ नगरसेवक निवडून आले. पाच अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे ८२ सदस्यांचे पाशवी बहुमतासह ‘श्रीमंत’ महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे शहराचे कारभारी झाले. महापालिकेतील कोणतेही पद विरोधकांना मिळणार नाही याची तजवीज या जोडगोळीने केली. त्यादृष्टीने क्षेत्रीय कार्यालयांची पेâररचना केली. आठही क्षेत्रीय कार्यालयांचे सभापतीपद भाजपच्या हाती राहिल, याची पुरेपुर दक्षता घेतली.

सत्ताधारी भाजपने पाच वर्षात सर्व नगरसेवकांना एकेक पद देण्याचे धोरण ठरविले. पहिल्या अडीच वर्षात नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौर तर शैलजा मोरे, सचिन चिंचवडे यांना उपमहापौरपदी संधी दिली. सीमा सावळे यांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले. त्याचवेळी महापालिका कारभारात सर्वाधिक शक्तिशाली समजल्या जाणाNया स्थायी समितीत प्रत्येक वर्षी १० यानुसार ५० नगरसेवकाला सभासदत्वाची संधी देण्याचे जाहीर केले. त्यानुसार, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्थायी समितीतील १० नगरसेवकांचे राजीनामे घेतले. मात्र, दुसNयाच वर्षी या धोरणात बदल केला. स्थायी समितीत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विलास मडिगेरी यांना अध्यक्षपद दिले.

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानुसार निवडणुकीला केवळ १३ महिन्यांचा कालावाधी शिल्लक आहे. चार वर्षात तब्बल २७ नगरसेवकांना एकही पद मिळालेले नाही. नावासमोर लावण्यासाठी, मिरविण्यासाठी महापालिकेतील कोणतेच महत्वाचे पद त्यांना मिळालेले नाही. विषय समिती सभापती आणि प्रभाग अध्यक्षपद मिळालेले नाही. विषय समिती सभापतींची मागील महिन्यात निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो. पुढील वर्षी निवडणुकीच्या तोंडावर सभापतींच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे या नगरसेवकांना सभापतीपद मिळण्याची शक्यता कमी आहे.

चार वर्षानंतरही पद मिळेना –
सलग तिसऱ्यावेळी निवडून आलेल्या जयश्री गावडे, दुसऱ्यांदा निवडून आलेले शितल शिंदे, शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे, चंद्रकांत नखाते, संगीता भोंडवे, माया बारणे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, आरती चोंधे, महापालिकेत भाजपचे खाते उघडणारे आणि बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, पहिल्यावेळी निवडून आलेले संदीप वाघेरे, तुषार कामठे, बाळासाहेब ओव्हाळ, वसंत बोराटे, शैलेश मोरे, प्रियंका बारसे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, सविता खुळे, माधवी राजापुरे, सारिका बोऱ्हाडे, सारिका लांडगे, कोमल मेवाणी, संदीप कस्पटे, राजेंद्र गावडे, संतोष कांबळे यांना विषय समिती सभापतीपद अथवा प्रभाग अध्यक्ष यापैकी एकही पद मिळालेले नाही.
”महापालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना पदे मिळतील. निवडणुकीला आणखी एक वर्षांचा कालावधी आहे. पुढील वर्ष प्रभाग अध्यक्ष, विषय समिती सभापतींची निवडणूक होईल. आगामी वर्षभरात सर्व नगरसेवकांना पद देण्याचा प्रयत्न केला जाईल”.
– नामदेव ढाके (भाजप गटनेते तथा सभागृहनेते)