भाजप आमदाराने माझ्या हत्येचा कट रचला होता; अनिल गोटेंचा विधानसभेत आरोप

0
526

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – स्थानिक भाजप आमदाराने माझ्या हत्येचा कट रचला होता,’ असा खळबळजनक  आरोप धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज (बुधवार)  विधानसभेत केला आहे. मोबाईल फोनवर आलेल्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे, असे गोटे यांनी सांगितले. त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या पत्नीबद्दल अश्लील भाषेत मजकूर लिहून तो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला, असाही आरोप गोटे यांनी केला आहे.

अनिल गोटे म्हणाले की,  अवधान गावात भाषण सुरू असताना माझ्यावर देशी कट्ट्यातून नेम  धरण्यात आला होता. मात्र, एका अज्ञात डॉक्टराने कट्टा हिसकावून घेतल्याने माझा जीव वाचला. याबाबत वाडेकर नावाच्या व्यक्तींने ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केला आहे.  याबाबत धुळेच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवूनही अद्याप कारवाई करण्यास विलंब केला जात आहे, असेही गोटे म्हणाले.

राज्यात झपाट्याने गुन्हेगारी वाढत आहे. येथे आमदार सुरक्षित नसेल, त्याच्या पत्नीबद्दल अश्लिल  मजकूर व्हायरल करणाऱ्याला जामीन मिळात असेल, तर इतरांचे काय होणार? असा सवालही गोटे यांनी यावेळी केला. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे ६२ पैकी ५७ उमेदवार दुसऱ्या पक्षातून आले आहेत. तर ५७ पैकी २८ हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, अपहरणासारखे गुन्हे नोंद आहेत, अशीही धक्कादायक माहिती गोटे यांनी दिली.