भाजपाला गळती सुरू, लवकरच मोठे भगदाड पडणार ?

0
523

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले बहुसंख्य नगरसेवक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. मोशी येथील कार्यक्षम नगरसेवक वसंत बोराटे यांनी आपली नाराजी प्रकट करत बुधवारी सकाळी नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केल्याने भाजपाला मोठा झटका बसला आहे. बोराटे हे भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या कोअर टीममधील असल्याने भाजपा प्रचंड अस्वस्थ आहे. दरम्यान, अशा प्रकारे अस्वस्थ असलेले २३ नगरसेवक टप्याटप्याने भाजपाला रामराम करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या पसरल्याने आमदारांची पळापळ सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच आपले नवीन पदाधिकारी जाहिर केले आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवकाध्यक्ष इम्रान शेख या भोसरी मधील तिघांवर पूर्ण जबाबदारी टाकून आमदार लांडगे यांचा अचूक `बंदोबस्त` केला. दोनच दिवसांत भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांचा राजीनामा झाल्याने, आमदार महेश लांडगे यांनी भाजपाची तटबंदी भक्कम असल्याचा जो दावा केला होता तो एकदम फोल ठरला आहे. भाजपाचे असंख्य रथीमहारथी नगरसेवक आता राष्ट्रवादीच्या मार्गावर असून सुरू झालेली गळती आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. भाजपामधून राष्ट्रवादीत पक्षांतर भोसरी विधानसभेत सर्वाधिक आहे की चिंचवडमध्ये याचीच सद्या चर्चा सुरू आहे. निवडणुकिला साधारणतः तीन महिने बाकी आहे. महापालिकेची मुदत १३ मार्च म्हणजे महिनाभर आहे. त्यानंतर सर्व सूत्रे प्रशासकाच्या ताब्यात जाणार आहेत. १३ मार्च पर्यंत दिवसाआड भाजपाला एक धक्का देऊन जेरीस आणायचे आणि नंतरच्या काळात घाऊकमध्ये पक्षप्रवेश करून भाजपाला मोठे भगदाड पडण्याची मोठी शक्यता राजकिय वर्तुळात वर्तविण्यात येते आहे.

नगरसेवक वसंत बोराटे यांच्या प्रमाणेच भाजपामधील भ्रष्टाचारावर सतत तुटून पडणाऱ्या काही नगरसेवकांनीही राज्याचे उपमुख्ममंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाची बोलणी केली आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रथीमहारथींची नावे चर्चेत असल्याने स्वतः जगताप अस्वस्थ आहेत. नगरसेवकांनी कोणत्याही परिस्थिती भाजपा सोडू नये, त्यांचे म्हणने एकून घेऊ आणि न्याय देऊ, अशा आशयाचा माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन, एसएमएस काही असंतुष्ठ नगरसेवकांना आल्याच्या बातम्याही पेरण्यात आल्या. नगरसेवकांचे पक्षांतर रोखण्यासाठी भाजपात बैठकांचे सत्र सुरू असून काही नेत्यांकडे खास जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेची उमेदवारी तुम्हालाच मिळणार आणि सर्व खर्च पक्षाकडून केला जाणार, अशी आश्वासने काही असंतुष्ठ नगरसेवकांना मिळाल्याचे सांगण्यात येते.

महापालिका निवडणुकिसाठी प्रभाग रचना आराखडा करण्यात आला. तो भाजपासाठी अनुकूल असल्याचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी जाहिर केले. त्याच दिवशी महापौर माई ढोरे, सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी ही प्रभाग रचना म्हणजे भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांची लचकेतोड असल्याचा गंभीर आरोप पत्रकारांशी बोलताना केला. भाजपामधील हे परस्पर विरोधातील दावे पाहून संघटनेत मेळ नसल्याचे चित्र समोर आले. काही नगरेवकांच्या समर्थकांनी चऱ्होली प्रभागात दिघीचा भाग नको अशी ५०० लोकांच्या सह्यांची एकच हरकत घेतल्याने दिघीतील मतदार भाजपावर नाराज झाला. शिवेसेनेचे कुणाल तापकीर यांनी याच मुद्यावर प्रसिध्दीपत्रक काढून भाजपाचे उमेदवार मते मागायला आल्यावर दिघी करांनी त्यांना जाब विचाराव असे आवाहन केल्याने संभाव्य भाजपा उमेदवारांची कोंडी झाली. हरकत व सुचना कशा पद्धतीने घ्याव्यात याबाबत मोठा गोंधळ भाजपामध्ये पहायला मिळाला. त्यामुळे संतापलेल्या आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांची कठोर शब्दांत हजेरी घेतल्याचे समजते.

वसंत बोराटे यांच्या आरोपांनी खळबळ –
भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपा सोडताना नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे, असे आरोप करताना त्यांनी थेट आमदार महेश लांडगे यांच्याकडे उंगली निर्देश केल्याने खळबळ आहे.