भाजपाचा निगरगट्टपणा कायम, सॉफ्टवेअरच्या नावाखाली 30 कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग

0
283

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) : भाजपच्या नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत शंभर टक्के भ्रष्टाचार झाल्याचे सांगितल्याने सत्ताधा-यांचा बुरखा फाटला. परंतु, भ्रष्टाचारी कारभारामुळे बेअब्रू झालेल्या सत्ताधाऱ्यांनी याच सभेत स्मार्ट सिटीत सॉफ्टवेअरच्या नावाखाली 30 कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग करून कहर केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.

वाघेरे म्हणाले, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कामात झालेला भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभारावरून प्रशासनाला जाब विचारला. याच सभेत भाजपच्या अनेक नगरसेवकांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. परंतु भ्रष्टाचारी प्रवृत्तीने पाच वर्षे महागरपालिका चालवणा-या सत्ताधा-यांना त्याचा काही फरक पडत‌ नाही.

या सभेत निवडणुकीच्या तोंडावर आणखी 30 कोटींचा घोटाळा करण्याचे प्लॅनिंग सत्ताधाऱ्यांनी केल्याचं समोर आले.‌ रस्ते खोदाई आणि केबल टाकण्याच्या कामात करोडोंचा चुराडा सत्ताधा-यांनी केलेला असताना आता रस्ते खोदाईच्या नियोजनाच्या नावाखाली सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचे मोठे काम काढण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी 5 वर्षासाठी 30 कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा निर्णय चुकीच्या पध्दतीने उपसूचना सभा कामकाजात घुसवून घेण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा.