भाजपने मला फसवले, माझ्या पक्षाला धोका – महादेव जानकर

0
1139

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – भाजपने मला फसवले, माझ्या पक्षाला धोका दिला आहे, असा आरोप महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. तसेच दौंड, जिंतूरच्या जागेचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते घेतील, असे सांगत त्यांनी असहकार्याचे संकेत दिले आहे.

महादेव जानकर यांनी मुंबईत आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन युतीतील जागावाटपाबाबत   नाराजी व्यक्त केली.

जानकर म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शब्द देवून सुध्दा रासपला जागावाटपात गंगाखेड विधानसभा ही एकमेव जागा दिली. भाजप बरोबर राहून आम्ही भरडलो गेलो आहे. आमच्या आमदारांनी गद्दारी केली.

आज शिवसेना मोठा भाऊ असतानासुद्धा भाजप बरोबर जात्यात आहे. आम्ही सुपात आहोत. पण आता वेळ गेली आहे. बोलून काही उपयोग नाही. मनाचा मोठेपणा दाखवून महायुती बरोबर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या आहेत,  तर भाजपच्या वाट्याला मित्रपक्षांसह १६४ जागा आल्या आहेत. यात १५० जागांवर भाजपने स्वतःचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.