भाजपने तगडा उमेदवार दिल्याने अशोक चव्हाण नांदेडच्या रिंगणात   

0
666

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजपने नांदेड लोकसभा मतदारसंघातून  प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसनेही  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे.  भाजपने तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे अशोक चव्हाणांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

चिखलीकर हे अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक मानले जातात. आगामी निवडणुकीत ते चव्हाण विरोधकांची मोट बांधू शकतील, अशी भाजपला अपेक्षा आहे.  तसेच तगडा उमेदवार  देऊन अशोक चव्हाण  यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्याची खेळी भाजपने केली आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण हे नांदेडमधून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे.

प्रतापराव चिखलीकर चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला  खिंडार पाडणार का?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिखलीकर यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार रिंगणात  उतरल्याने  चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.