पुण्यात खंडणीसाठी अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकल्याची ११ तासात सुखरुप सुटका

0
661

पुणे, दि. २४ (पीसीबी) – दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याची पोलिसांनी ११ तासात सुखरुप सुटका केली. मात्र अपहरणकर्ते पसार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

शनिवारी (दि.२३) संध्याकाळच्या सुमारास वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळत असताना दोन वर्षांच्या पुष्कराज धनवडेचे अपहरण झाले होते. पुष्कराजचे वडील सोमनाथ धनवडे व्यावसायिक आहेत. अपहरण करुन अपहरणकर्त्यांनी सोमनाथ यांना फोन करुन १० लाखांची खंडणी मागितली. सोमनाथ यांनी याबद्दलची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासादरम्यान अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा ७० ते ८० जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला. त्यांनी हा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली.

युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण आणि त्यांचे कर्मचारी उंड्री भागातील सेक्टर ४९ मध्ये शोध घेत होते. पहाटेच्या सुमारास त्यांना तेथे एका बाजूला तीन ओसाड बंगले आढळले. त्यांनी या बंगल्याची झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका बंगल्यात हालचाल जाणवली. तेव्हा त्यांनी आपल्या पथकाला सावध केले. त्यांनी आत प्रवेश केला असता बंगल्याच्या तारेच्या कंपाऊंडवरुन एक जण पळून जाताना दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता पुष्कराज धनवडे तेथे आढळून आला. पोलिसांनी पुष्कराज याला त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.