भाजपच्या ‘या’ मंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज; विधानसभेला तिकीट कापणार ?

0
410

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यातच देशमुखांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देशमुख यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे समजते.

सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेच्या अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे सरकारची कोंडी झाली आहे.   कोल्हापूर, सांगलीतील पुराच्या काळात मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून  सुभाष देशमुख  यांना प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्यावर नाराज आहेत.

सुभाष देशमुख यांच्यामुळे पक्ष अडचणीत येत असल्याने  त्यांना डावलून सोलापूर दक्षिण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या हालचाली सुरु  झाल्या आहेत.  त्याचाच भाग म्हणून सोलापूर दक्षिण काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्याचे  बोलले जात आहे.

माने यांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली आहे. कोणाला अंधारात ठेवून माने यांना पक्ष प्रवेश देण्यात आलेला नाही, असे सुचक विधान ठाकरे यांनी केले आहे. यामुळे माने यांचा शिवसेना प्रवेश देशमुख यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.