भाजपच्या ‘या’ मंत्रीबाई म्हणतात, ‘मदरशातून दहशतवादी तयार होतात’

0
198

भोपाळ, दि. २१ (पीसीबी) : मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तापत आहे आणि नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांत भर पडत आहे. कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजपच्या मंत्र्यांकडून अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या मंत्री उषा ठाकूर यांनी मदरशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मदरशांना देण्यात येणारी सरकारी मदत बंद करावी, कारण सर्व दहशतवादी हे मदरशातूनच तयार होतात असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरही टीका केली. कमलनाथ सरकार मंदिरांकडून जिझिया कर वसूल करत होते, असा आरोप त्यांनी केला.

‘आमच्या श्रमाचा पैसा असा वाया जाऊ नये’
इंदूरमध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत उषा ठाकूर म्हणाल्या की, “मदरशांना देण्यात येणारी सरकारी मदत बंद करायला हवी. वक्फ बोर्ड ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. जर मदरशांना कोणी वैयक्तिक मदत करणार असतील तर त्यांनी ती खुशाल करावी, आपले संविधान त्याला मान्यता देते. पण आम्ही आमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशाचा असा अपव्यय करु देणार नाही. तो पैसा विकासासाठी वापरला गेला पाहिजे.”

‘मदरशातून दहशतवादी तयार होतात’ : उषा ठाकूर
मदरशातील शिक्षणावर टीका करताना त्या म्हणाल्या की, “मदरशात ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ते पाहता त्यातून दहशतवादी तयार होतात. त्यामुळे देशविरोधी कारवाया ज्या या मदरशातून तयार होतात, ते बंद करायला हवे आणि जनतेच्या श्रमाचा पैसा हा विकासासाठी वापरण्यात यावा.”
—————–