भाजपचे अनेक आमदार संपर्कात: जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटामुळे भाजपमध्ये खळबळ

0
213

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पाटील यांच्या या माहितीमुळे राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली असून भाजपमध्येही अस्वस्थता पसरली आहे. भाजपमधील कोण कोण आमदार राष्ट्रवादीच्या आणि विशेषतः पवार काका पुतण्यांच्या संपर्कात आहेत याचा शोध भाजपने सुरू केला आहे.

राज्यातील राजकारणात सक्रीय असणऱ्या काही मान्यवरांनी खासगीत बोलताना खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही, असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील, असं जयंत पाटलांना सांगितलं आहे.

कोरोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळे 10 ते 12 आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटलांनी म्हटलंय.

पुणे, पिंपरी चिंचवडकडे लक्ष –
दरम्यान, पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड मधील काही आमदार हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्रवादीला उतरती कळा लागल्याने ते भाजमध्ये गेले. आता राज्यातील आघाडी सरकार स्थिरस्थावर होते आहे आणि ते पाच वर्षे टिकेल अशी शक्यता दिसू लागल्याने भाजपमधील या पवार समर्थकांची चुळबूळ वाढली आहे. त्यातच आता एकनाथ खडसे यांच्या सारखा बडा नेता भाजपला रामराम करत असल्याने पवार काका पुतण्यांशी जुनेच हितसंबंध असलेल्या आमदारांनीही चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. लगेचच प्रवेश करणे पक्षांतरबंदी कायद्यामुळे परवडणारे नाही आणि पोटनिवडणूक लागली तर पुन्हा खर्च कऱणे अशक्य आहे. त्यामुळे हे आमदार आता पुन्हा राष्ट्रवादीशी घरोबा करू पाहत आहेत, पण अंतर राखून आहेत. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका सव्वा वर्षावर आहेत. त्यावेळी राजकारणाचे फासे कसे पडतात त्यावर या दलबदलुंचा निर्णय अवलंबून आहे. मात्र, खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजपमधील काही आमदारांचे मनोधैर्य खचले आहे, असे सांगण्यात येते.