भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीतून एकनाथ खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

0
510

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला असून त्यांच्या जागी गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे.

राज्यातील उमेदवारांच्या निवडीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. नेहमी मुख्य समितीत स्थान असणाऱ्या खडसेंना या समितीत स्थान नसल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, विशेष संपर्क अभियान समितीत प्रकाश मेहता व शायना एनसी यांच्यासोबत एकनाथ खडसेंना स्थान देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत राज्यातील १७ जागांवरील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. ही चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात असून दोन दिवसांनंतर लोकसभा उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दोन दिवसांपूर्वीच नितीन गडकरी, हंसराज अहीर, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, संजय धोत्रे आदींची नावे अंतिम करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता उर्वरित नावांबाबत कोअर कमिटी चर्चा करत आहे. काही जागा अंतिम झाल्या असून ७ ते ८ जागांवरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही नवीन चेहरेही देण्याचा विचार सुरू असून सोलापूर, भंडारा-गोंदिया, नांदेड, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा यासाठी विचार केला जात आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.