भाजपकडे सत्ता आहे म्हणून तेथे जाणे योग्य नाही – खासदार उदयनराजे

0
468

सातारा, दि. २ (पीसीबी) –  अनेक दिवसांपासून भाजपचे लोक पक्ष प्रवेशासाठी माझ्या मागे लागले आहेत. भाजपची वाटचाल सध्या जोरात सुरू आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सत्ता भाजपकडे आहे म्हणून तेथे जाणेही योग्य नाही,  असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार  उदयनराजे यांनी व्यक्त केले.

भाजप मध्ये प्रवेश करण्याबाबत  उदयनराजे भोसले यांनी  कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, भाजपच्या  कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत.  कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत, कंपन्या बंद पडत आहेत. गेल्या चार-पाच वर्षात साताऱ्यात विकास कामे झाली. परंतु सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो. मागील काळात आडवा पाणी जिरवा, असे राजकारण झाले. ईव्हीएम मशीन बाबत मी बोललो परंतु बाकीचे कोणी बोलले नाही.

मध्यंतरी माझ्यावर गुन्हे दाखल झाले. यावर राष्ट्रवादीचे नेते काही बोलत नव्हते.  असे असताना राष्ट्रवादीबरोबर कशासाठी राहायचे. जर राष्ट्रवादी नेत्यांना आवर घालत नसेल, तर मी काय समजायचे?’ असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही, याबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेऊ, असे उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना यावेळी  सांगितले.