आबांच्या आठवणीने शरद पवार भावूक

0
393

सांगली, दि. २ (पीसीबी) –  पुढच्या पाच वर्षांमध्ये राज्याला रोहितच्या रुपाने आबा पाहायला मिळतील, असे भावूक प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तासगावमध्ये माजी उपमुख्यमंत्री आरआर पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित होते.

पवार म्हणाले, माझ्यापेक्षा आबा २० वर्षांनी लहान होते. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांचे कर्तृत्व बहरण्याचा कालावधी होता. आबांच्या जाण्याचे दु:ख अंत:करणात कायम राहिल. मात्र पुढच्या पिढीला पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला रोहितच्या रुपाने आबा पहायला मिळतील. आबांच्या कुटुंबाला इथुन पुढे असेच प्रेम द्या. या प्रेमातून राज्याला कर्तृत्ववान  नवी पिढी पहायला मिळणार असे शरद पवार म्हणाले.

त्यांनी स्वच्छ चारित्र्याचा आदर्श निर्माण करून काम केले. आबांची ग्रामीण भागाशी नाळ होती. ग्रामविकास मंत्री पदाच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांची दखल देशपातळीवर घेतली गेली. राज्यात काही जिल्हे नक्षलवादाने ग्रासलेले असताना आबांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले. नक्षलवादी भागात मोटारसायकलवरून जाणारे राज्यातील पहिले मंत्री आबा होते. आजही आदिवासी बांधव आबांचे नाव घेतात, असेही पवार म्हणाले. तर २०२४ मध्ये तासगाव मतदारसंघासाठी रोहितला पक्ष तिकीट देईल एवढी रोहितची मजल आहे, असा विश्वास देखील  जयंत पाटील यांनी व्यक्त केला.