भगवद्गीता घराघरात पोहचली तरच भारत पुढे जाईल- मोहन भागवत

0
737

पुणे, दि. १९ (पीसीबी) – ‘व्यक्तीने जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे, याचे निर्देशन भगवद्गीता करते. त्यामुळे गीतेचा अभ्यास आणि आचरण आवश्यक आहे. भगवद्गीता घराघरात पोहोचली तर भारत आताच्या शंभरपट सामर्थ्यासह विश्वगुरू म्हणून पुढे येईल,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले.

गीता धर्म मंडळाच्या ‘गीता-दर्शन’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहंदळे, मोरेश्वरबुवा जोशी, प्राचार्य मुकुंद कोंढवेकर आदी उपस्थित होते. वसुधा पाळंदे यांना सरस्वतीबाई आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘गीतेमध्ये सांगितलेला धर्म सनातन, विश्वधर्म, शाश्वत धर्म असून, तोच विश्वाच्या उत्पत्तीपासून सुरू आहे. त्यानुसारच विश्वाची स्थिती, गती, लय सुरू आहे. कोणी कितीही प्रयत्न करो, ती त्या प्रमाणेच सुरू राहील. संतुलित आचरण म्हणजे धर्म. प्राणरक्षणासाठीही धर्म कधी सोडू नये. जो धर्मासाठी जगतो, तो देशासाठी जगतो,’ असे भागवत यांनी सांगितले.

‘जीवन सुखी करण्यासाठी महाभारत काळापूर्वी जे विचार, संप्रदाय निर्माण झाले त्या सर्वांचे सार गीतेमध्ये आढळते. तर गीतेनंतरही ज्या विचारधारा निर्माण झाल्या त्यातील पूजाअर्चा, पद्धती वेगळ्या असल्या तरी त्यांचाही संदेश आपल्या गीतेमध्ये आढळतो, हेच गीतेचे सामर्थ्य आहे,’ असेही भागवत म्हणाले. गीतेमधील दुसरा, १२, १५, १६, १७ आणि १८ हे अध्याय दररोज वाचले पाहिजेत. त्याचे चिंतनही केले पाहिजे,’ असेही भागवत यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीला सोवनी यांनी केले.