शिवसेनेशी जाहीर वाद टाळा; मुंबईतील बैठकीत अमित शहांच्या सुचना

0
737

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसोबत जाहीर वाद न करता जुळवून घेण्यासाठी सह्याद्री अथितीगृहावर भाजपने मंगळवारी रात्री तातडीची बैठक घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उपस्थित होते.  तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत खलबते झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर भाजपने कामाला सुरूवात केली आहे.  या बैठकीस यावेळी मुख्यमंत्र्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार हे महत्वाचे नेते उपस्थित होते.

राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत  घेण्यात आला. तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबद्दल तूर्तास तरी पक्षाने जाहीर वाद टाळत  समंजस्याची भूमिका घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली.  तसेच लोकसभा मतदारसंघांबाबतही विभागवार चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. राज्यातील दुष्काळी परिस्थती, तसेच मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड या राज्यातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.