बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल

0
456

चाकण, दि. 20 (पीसीबी): बेकायदेशीरपणे एका टेम्पोमध्ये 12 म्हशी अत्यंत दाटीवाटीने कोंबून वाहून नेल्याप्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी दीड वाजताच्या सुमारास शेलपिंपळगाव शिक्रापूर रोडवर घडली. अरुण कैलास अडसूळ (वय 31, रा. हडपसर, पुणे. मूळ रा. पोटेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अशोक दिवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शेलपिंपळगाव शिक्रापूर रोडवर आरोपी टेम्पो चालक अडसूळ याने त्याच्या टेम्पोमध्ये (एम एच 12 / एल टी 6970) क्षमतेपेक्षा जास्त अतिशय दाटीवाटीने बारा म्हशी कोंबून त्यांना क्रूरतेने बांधले. टेम्पो मध्ये कोणत्याही प्रकारचा चारा, पाणी न ठेवता त्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक केली. याबाबत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 11 (1), मोटार वाहन कायदा कलम 66/192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहे.